||श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव||
र. नं. ए. ७०८ (१९६३ )

इतिहास

story

मंदिराचा इतिहास

"शेगाव मुंडगाव संता प्रिय | दोघांनाही सौख्य होय |
ऎसे केले गजानने |
गजानन विजय ग्रंथी | दास गणू ते वर्णिती |,
स्वये स्वप्नी पादुका देती | त्याने धन्य मुंडगाव |,
काही जरी असली मात | तरी धन्यता ये मुंडगाव प्रत |,
प्रथम शेगाव ख्यात |
दुजे स्थान मुंडगाव ते" |
श्री गजानन महाराज पादुका, मुंडगाव संस्थेचे महत्त्व

गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव. झ्यामसिंग शेखावत हे राजपूत गृहस्थ मुंडगांव येथे राहत होते.
ते महाराजांचे फार मोठे भक्त होते. महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ह्या झ्यामसींग यांच्याच हातून पाठवल्या होत्या.

पुढे वाचा
गजानन महाराज मुंडगाव मंदिराविषयी

|| गण गण
गणात बोते ||

मंदिराचा इतिहास:

श्रींच्या प्रासादिक पादुकांची स्थापना

मुंडगांव येथिल श्रींचे परम भक्त श्री झ्यामसिंग राजपूत, श्री पुंडलिक भोकरे, बायजाबाई, श्री काशिनाथपंत कुळकर्णी व इतर भक्त नियमित शेगांवची पायदळ वारी करत असत. 1906 ला मुंडगावातील भागाबाई ठाकरे नावाच्या बाईने पुंडलिक भोकरेंना खरी भक्ती व श्रद्धा म्हणजे काय? खरा गुरू कसा असतो? नुसता तुझा ताप बरा झाला म्हणून तू त्या वेडयापिश्या गजाननाला गुरू मानतोस हे बरे नाही, असे सांगून पुंडलिकाची कान उघाडणी केली. त्यांच्या श्रद्धेला धक्का बसेल अशा रीतीने आपले विचार त्याच्यासमोर मांडले. पुंडलिकांचे वय तरी किती? ते अतिशय साधे भोळे असे भक्त होते. त्यांना भागाबाईचे सांगणे पटु लागले. त्यांनी तीला अंजनगावला केंजाजी महाराजांकडे येण्यास होकारही दिला. मात्र श्री गजानन महाराज आपल्या भक्तांची फसगत होऊ देत नाहीत. अशा गोष्टींपासून त्यांचा सांभाळ करतात. रात्री महाराज पुंडलिकाच्या स्वप्नात आले व म्हणाले अरे! पुंडलिका त्या भागीच्या सल्ल्याने अंजनगावास गुरू करण्यास जातोस काय?

महाराजांनी स्वप्नात येऊन पुंडलिकांना गण गण असा मंत्र दिला व अजून तुला काय पाहीजे ते सांग म्हणजे आज तुझे ते मागणेही पुरविन असे सांगितले. पुंडलिकांनी महाराजांकडे नित्य पूजा करण्यासाठी पादुका मागीतल्या.सद्गुरूंनी स्वप्नात येऊन दिलेल्या पादुका घेण्यासाठी पुंडलिक उठले तोच त्यांना जाग आली. सभोवताली पाहतात तर तेथे कुणीही नव्हते. तसेच पादुकांचाही पत्ता नव्हता. त्यांना काही उलगडा होईना. मनातील संशय जाईना. सद्गुरूंच्या शब्दाला आजपर्यंतही बट्टा लागला नव्हता. उदया दोन प्रहरी पादुकांची पुजा कर. असे म्हणाले परंतू पादुकांचा पत्ता नाही मग दोन प्रहरी पूजा कशी काय करायची? हयाचा अर्थ समजावा तरी काय? महाराजांनी नव्या पादुका तयार करून त्यांची पूजा करावयास सांगीतले नसेंल ना. मी स्वप्नात त्यांच्या पायातील पादुका मागीतल्या व त्याच त्यांनी मला दिल्या. मग मी नव्या कशाला घेऊ?

इतक्यात भागीबाई ठाकरीन त्यांच्या घरी आली. पुंडलिकाने तिला स्पष्ट सांगीतले की, मी काही आता येत नाही. तुझी मर्जी असेल तर तूच अंजनगांवला जा. मी एकदा गजानन महाराजांना गुरू केले आहे तेव्हा त्यांचे पाय आता मी सोडणार नाही. हा माझा निश्चय आहे. त्यांचा निर्धार ऐकून भागाबाई एकटीच अंजनगांवी गेली.इकडे पुंडलिकास काय करावे काही सुचत नव्हते. पादुकांची पुजा तर दोन प्रहरीच करावयाची आहे. परंतू पादुका आणावयाच्या कोठुन? सदगुरूंच्या पावन आणि रात्री स्वप्नात बघितल्या त्याच व तशाच पादुका हव्यात असा पुंडलिकाच्या मनाने हट्ट केला. जोपर्यंत मला महाराजांच्या पादुका मिळत नाहीत. तोपर्यंत मी पाणी देखील पिणार नाही. असा त्याने हट्ट धरला,संकल्प केला. तो गावच्या बाहेर शेगांवच्या वाटेवर डोळे लावून बसला.

इकडे दोन दिवसांपूर्वी झ्यामसिंगजी ्रशेगांवी आलेले होते. महाराजांचे दर्शन व मुक्काम आटोपून ते तिस-या दिवशी मुंडगांवी निघण्याच्या वेळी महाराजांचे दर्शन घ्यायला गेले. तेवढयात महाराज बाळाभाऊला म्हणाले, हया माया पायातील पादुका पुंडलिकासाठी दे. समर्थांच्या आज्ञेप्रमाणे बाळाभाऊंनी त्या पादुका याम​िसंगांजवळ पुंडलिक भोकरेंना पुजेकरीता दिल्या.

झ्यामसिंग मुंडगावाच्या वेशिवर येतो न येतो तोच त्यांना पुंडलिक भोकरे तेथे बसलेले दिसले. ते अतिशय व्याकुळ अवस्थेत झ्यामसिंगांजवळ जावून त्यांना विचारू लागले. मला देण्यासाठी महाराजांनी काही प्रसाद दिला का? झ्यामसिंग सुरवातीस काहीच बोलले नाही. तेव्हा पुंडलिक त्यांना अधिकच खोदुन खोदुन विचारू लागले. पुढे त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत याम​िसंगांस सांगितला. तो ऐकुन झ्यामसिंग आश्चर्यचकित झाले व त्यांनी आपल्या पिशवीतील त्या परमपवित्र पादुका त्यांच्या हातात ठेवल्या व त्यांना शेगांवात घडलेला प्रसंग सांगितला. आणि तुला पुजा करण्यासाठी हया पादुका द्यायला महाराजांनी सांगितले, असे सांगितले. ते ऐकून पुंडलिकाचे अंत:करण भरून आले. तो आनंदाने घरी गेला व त्या पादुकांचे प्रेमभराने पूजन केले.

नंतर झ्यामसिंग पंुडलिकास म्हणाले, ‘‘पुंडलिका तुझे घर कुडाचे म्हणजे झोपडीचे अशा झोपडीत तु समर्थांच्या पादुका ठेवण्यापेक्षा माया घरी मी महाराजांचे मंदिर बांधले आहे तेथेच ठेव. इथल्यापेक्षा त्याठिकाणी त्या सुरक्षित राहतील व सर्वांना त्यांचे दर्शनही घेता येईल. आपण तुला दिलेल्या पादुकांची मिरवणूक काढत जावू. तुला दिलेल्या पादुकांचे पुजन करण्याचा मान प्रथम तुलाच राहील. एवढेच नाही तर हया पादुकांची गावातून मिरवणूक काढतांना पालखी उचलण्याचा पहिला मानही तुझाच असेल असे मी तुला वचन देतो.’’ झ्यामसिंगांचे म्हणणे पुंडलिकास पटले, त्यांच्या शब्दावर पुंडलिकांचा पूर्ण विश्वास होता. झ्यामसिंग महाराजांचा एकनिष्ट भक्त, गर्भ श्रीमंत. ते हया पादुकांची उत्तम प्रकारे सेवा करू शकतील याची त्यांना खात्री होती. महाराजांनी दिलेल्या त्या परमपवित्र अशा पादुका सुरक्षित रहाव्या म्हणूण पुंडलिक भोकरेंनी त्या पादुका झ्यामसिंगाने बांधलेल्या मंदिरात आणून भक्तिभावाने ठेवल्या. पुंडलिक व सर्व भक्तमंडळी झ्यामसिंगाच्या वाडयात जावून पूजा करू लागले.